Tuesday, May 20, 2014

सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड - भाग ४

मनालीतील पहिली सकाळ अगदी प्रसन्न वातावरणात उजाडली. आज खरं तर लोकसभा निवडणुकीचा दिवस. परंतु शांतपणे जीवन जगणाऱ्या मनालीवासीयांच्या जीवनात ह्याने सुद्धा फारसा फरक पडला नव्हता. आज वशिष्ठ कुंड आणि स्नो पॉइंट करायचे होते. रोहतांग पासला बर्फमय प्रदेश पाहायला जायची सर्वांचीच इच्छा
होती परंतु तिथं रविवारीच नव्याने बर्फवृष्टी झाली होती आणि त्यामुळे तिथं जाणं शक्य होणार नव्हतं.


एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर तिथले पेपर बघणे हा एक शिकण्याचा अनुभव असतो. नंतर एक दिवशी पेपर चाळताना जाहिरातीचं अगदी किमान प्रमाण मोठ्या प्रकर्षाने जाणवलं. अजून एक बातमी वाचनात आली. रोहतांग पासच्या पलीकडे जी हिमाचल प्रदेशातील गावे आहेत तिथले नागरिक अतिकडक हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी हिवाळ्यात मनालीला येऊन राहतात. आणि साधारणतः हिवाळा आटोक्यात आला की आपल्या गावी परततात. ७ मेला मतदान असल्याने त्यांना आपल्या मूळ गावी परतणे आवश्यक होते. परंतु नव्याने झालेल्या बर्फवृष्टीमुळे बिचारे मनालीतच अडकून बसले होते आणि मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. पुढे त्यांचे नक्की काय झालं हे वाचनात आलं नाही. अजून एक बातमी म्हणजे काही अतिदुर्गम भागातील ३ गावाच्या गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. गावापर्यंत दळणवळणाच्या मुलभूत सुविधा उभारण्यात राजकीय पक्षांना आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ हा निर्णय होता. आपल्या निवडणूक आयोगाचा मात्र मोठ्या कौतुकाने इथे उल्लेख करावासा वाटतो. ह्या दोन्ही ठिकाणी निवडणूक कर्मचारी आपली ड्युटी निभावण्यास आदल्या दिवशीच पोहोचले होते.


आमचे सहप्रवासी अमोल कुलकर्णी हे नाशिकचे रहिवाशी. वर्तमानपत्रातील जाहिरातींशी निगडीत असा त्यांचा व्यवसाय.  मोठ्या एकाग्रतेने पेपर चाळताना पाहून मी त्यांना विचारलं, "कुलकर्णी साहेब, काय खास बातमी?" "नाही, इथले लोक कशा प्रकारे जाहिरात करतात ते जरा बघतोय!" त्यांचं हे उत्तर आपल्याला आवडलं!


आजच्या प्रवासातील ठिकाणांपर्यंत बस जाऊ शकत नसल्याने तवेरा, इनोवा वगैरे SUV प्रकारातील गाड्यांची सोय करण्यात आली होती.  वैयक्तिक प्रवास करताना हा प्रवास खूप महागडा ठरण्याची शक्यता असते कारण अशा गाड्यांचे मालक हे बऱ्याच वेळा पर्यटकांना फसवायला टपलेले असतात असा माझा केरळ प्रवासातील अनुभव. अशा अनेक गाड्या हॉटेलच्या समोर लागल्या होत्या. आज बसप्रवास नसल्याने सोहम आणि अन्य बालके मोठ्या आत्मविश्वासाने नास्त्यावर तुटून पडली होती. आपल्या इच्छेनुसार गाडी प्राप्त व्हावी हे सोहमची इच्छा केवळ इछाच राहिली. आम्ही गोविंद रणमारे कुटुंबीयांसोबत होतो. गाडीचा चालक हा सर्व गाड्यांचा मालक होता.
आदल्या दिवशी आदित्यने सूचनांचा भडीमार केला होता. आपल्या गाडीचा क्रमांक नीट ध्यानात ठेवा. आपल्या गाडीतील सहप्रवाशांबरोबरच शक्यतो राहा. ट्राफिक जाम वगैरे झाला तर तो सोडविण्याच्या भानगडीत पडू नका. ह्या गाड्यांचे स्थानिक ड्रायवर ज्या क्षणी मोकळा रस्ता मिळेल त्या क्षणी गाडी भरधाव वेगाने हॉटेलला घेऊन येतील आणि परतताना वेळीच परत न आल्यास स्वखर्चाने हॉटेलला परतण्याची तयारी ठेवा!वगैरे वगैरे!
पहिला थांबा होता वसिष्ठ कुंड.


लक्ष्मण ह्या भागात आला असता वशिष्ठ मुनींना स्नानासाठी दूरवर जावं लागतं हे पाहून त्याने बाण मारून ही गरम पाण्याची कुंड निर्माण केली आहेत अशी माहिती सर्वज्ञ आदित्य (भोईटे हो!) ह्यांनी दिली. वशिष्ठ मंदिरासोबत रामाचे आणि शंकराचे मंदिर सुद्धा आहे. ज्या वेळी ह्या मंदिरांचा  जीर्णोद्धार होतो त्यावेळी बाजूच्या जंगलातील सर्वात जुन्या वृक्षाचा बुंधा आणून मंदिराजवळ उभारला जातो. वशिष्ठ मंदिराजवळ असे दोन बुंधे आणि रामाच्या मंदिराजवळ एक आढळल्याने सुज्ञ लोकांनी योग्य तर्क काढावा. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष गरम पाण्याच्या कुंडांना भेट दिली. पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र कुंड आहेत. तिथे आत गेल्यावर पाहिलेल्या दृश्याने स्वतंत्र कुंडांच्या निर्मितीची गरज लक्षात आली!!


आता पुढचा टप्पा म्हणजे आदित्यच्या भाषेत ह्या सहलीचे मुख्य आकर्षण अर्थात हिमखेल बिंदू होता. ह्या ठिकाणी जाण्याआधी खास जॅकेट, लेदर शूज ह्या गोष्टी २०० रुपये भाड्याने आणि आवश्यकता भासल्यास १०० रुपयांचा  गॉगल विकत घ्यावं लागतं. ह्या गोष्टी इतर ठिकाणी थोड्या कमी दरात मिळण्याची जरी शक्यता असली तरी त्याच्या दर्जाविषयी आम्ही खात्री देवू शकत नाही असे आदित्य म्हणाला. आणि हो हे  जॅकेट आणि बूट आपल्या नेहमीच्या मापापेक्षा एक माप मोठी घ्यावीत हे सांगण्यास तो विसरला नाही. हे सर्व निकष पूर्ण करताना रंगसंगती वगैरे पाहायला जाल तर फसाल असा सल्ला द्यायला तो विसरला नाही.
 
भाड्याच्या दुकानाजवळ गाडी थांबली तर पूर्ण सावळागोंधळ होता. सर्व जॅकेट बाहेरून ओली लागत होती. परंतु तसेच मिळेल ते एक अंगावर ओढले. ते घालताना सुद्धा द्राविडी प्राणायाम करावा लागला. मग शूज कडे मोर्चा वळविला. ह्या क्षणी आदित्याचा सल्ला विसरलो आणि त्यामुळे पुढे थोडाफार त्रास सहन करावा लागला. माझ्या कपड्यांची निवड झाल्यावर सोहमची पाळी होती. त्याचा कोट, बूट वेगवेगळ्या ठिकाणी होते. हे सर्व निवडून आमचा मोर्चा गॉगलवाल्या सरदारजीकडे वळला. १०० रुपये किमतीचे ३ गॉगल खरेदी करण्यात आले. तोवर आम्हांला काहीसा उशीर झाल्याने आम्ही झटपट गाडीकडे धाव घेतली.


आता बर्फ रस्त्याच्या बाजूला दिसू लागला होता. आणि थोड्याच वेळात बर्फलीलेचे ठिकाण आले. इथे गाड्यांची खूप गर्दी झाली होती. वीणा वर्ल्ड असा पुकारा करीत आदित्य मंडळींनी आम्हांला एका बाजूला घेतलं.
तो सर्वांच्या नावाचा पुकारा करीत असतानाच आम्ही आमचा छंद सुरु ठेवला! 



वीणा वर्ल्डचा झेंडा मोठ्या दिमाखात फडकत होता!


सर्वांना एकत्र गोळा करण्यात यश आल्यावर पुन्हा एकदा आदित्यने सर्वांना आचारसंहिता समजावून सांगितली. वरती बर्फलीलेच्या ठिकाणापर्यंत चालत अथवा याकवर बसून जायचा पर्याय देण्यात आला होता. परंतु आम्ही चालत जाणेच पसंत केलं. वीस रुपये भाड्याची एक काठी मात्र आम्ही खरेदी केली. काही मंडळींनी मात्र याकवर बसून जाणे पसंत केले.


वरपर्यंत चालत जायची ही चढण पहा!




बाजूचा नजारा नेहमीप्रमाणे प्रेक्षणीय होता.


पर्वताचा चढ तसा तीव्र होता. ह्या एकंदरीत जय्यत तयारीने माझ्या हालचाली काहीशा मोकळेपणाने होत नव्हत्या. संपूर्ण चढणीचे तीन भाग करता येतील. प्राजक्ताला उन्हाचा त्रास होत असल्याने तिने छत्री घेणे पसंत केले. त्या पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या पार्श्वभूमीवर तिची गुलाबी छत्री मात्र शोभून दिसत होती.
विविध मंडळी आपल्या कुवतीनुसार वरती चढत होती.

मराठीतील गेले अनेक वर्षे 'होतकरू' असलेले लेखक आणि सोहम ह्यांचे हे छायाचित्र!





सोहम आणि मी एकमेकांवर बर्फ उडविण्याचा खेळ बराच वेळ खेळलो.

चांगला बर्फ कोठून गोळा करता येईल ह्यांची पाहणी करण्यात गर्क असलेला सोहम!



अचानक आलेल्या याकने सोहमची धावपळ केली आणि त्याच्या तयारीत खंड पडला. 

याकने जरावेळ इथे टाईमपास केला ही गोष्ट सोहमला अजिबात खपली नाही. 



एकदाचा याक पुढे गेला आणि सोहम कामाला लागला. 




बराच वेळ बर्फाची मारामारी केल्यानंतर बनविलेला हा बर्फगोळा!

तिथे रबरी टायरवरून खाली घसरत यायचा सुद्धा खेळ होता. काहींनी तो पर्याय स्वीकारला. दुसऱ्या चढणीवर असताना तिथे डाळवाला आला. त्याची पहिली चणाडाळ चविष्ट लागल्याने आम्ही अजून दोनदा त्या चणाडाळीचा आनंद घेतला. तिथे एक मुका काठीवाला होता. ह्या बिंदूपर्यंत आलेल्या काहीजणांना आता आपणास काठी पाहिजे असा साक्षात्कार झाल्याने ते ह्या काठीवाल्याकडून काठी घेत असत. काहीजण परतताना भाडे देऊ अशा समजुतीने काठी घेऊन तसेच पुढे चालू लागत. तेव्हा हा काठीवाला संतापाने तोंडाने जोराजोराने आवाज करीत अशा माणसांच्या मागे धावत जाई आणि त्यांना पैसे देण्यास भाग पाडी. बराच वेळ बर्फात खेळल्यावर आम्ही खाली उतरलो. एव्हाना उकडू लागलं होतं. तसं पाहिलं तर ह्या अंतराळवीराच्या वेषाची  गरज नव्हती असेच मला राहून राहून वाटत होते.


अशा वातावरणात समोर गरमागरम मैगी बनवून देणारा दिसल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष करायला आम्ही कोणी निर्मोही नव्हतो. त्यामुळे ५० रुपये दराच्या तीन मैगीच्या ऑर्डरी देऊन आम्ही बर्फात खेळणाऱ्या लोकांची मजा पाहत राहिलो. मैगीवाल्याने ह्या तीन मैगी बनवायला बराच वेळ घेतला. त्यामुळे नापसंती व्यक्त करणाऱ्या सोहमची प्राजक्ताने "दोन मिनिटातील मैगी फक्त टीव्हीवरच बनते" अशी समजूत काढली. हा एकंदरीत भाव जास्त आहे हे तत्वतः मैगीवाल्याने मान्य करीत मला एक फुकट चहा पाजला.


आता उतरणीचा मार्ग तसा सोपा होता. हा कोट आणि बूट कधी एकदाचे काढतो असे झालं होतं. शेवटी एकदाचे खाली उतरलो. तिथे असंख्य / अगणित गाड्या होत्या. त्यात आपली गाडी कशी शोधायची हा प्रश्न होता. नशिबाने आदित्य आणि जितेश तिथे होते आणि मग आम्हांला आमची गाडी लगेच मिळाली. गाडीच्या चालकाने आम्हांला सर्व वेष खाली काढून ठेवण्यास सांगितलं आणि व्यवस्थितपणे घडी करून हा सर्व प्रकार गाडीच्या टपावर ठेवून दिला.


परतीच्या प्रवासात एका राजबिंड्या ईगलचे आम्हांला दर्शन झाले. त्यानंतर निवडणुकीचा प्रभाव म्हणून एका पोलिसवाल्याने सुद्धा आमची गाडी अडवली. वीणा वर्ल्ड ऐकून त्याने आम्हांला जाऊ दिले. हॉटेलात पोहोचेस्तोवर अडीच झाले होते. झटपट ताजेतवाने होऊन आम्ही जेवणावर ताव मारला. इतके भरपेट जेवण आणि बऱ्याच दिवसांनी मिळालेली मोकळी दुपार ह्यामुळे बिछान्यावर आडवे होण्याचा मोह आम्हांला आवरला नाही. सोहमची IPL बरोबरची गहिरी दोस्ती इथेही सुरूच होती. मॅक्सवेलच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे आता त्याने सोहमच्या मनातील विराट कोहलीची जागा घेतली होती. पण ह्या IPL प्रकरणाने आमच्या झोपेत व्यत्यय येत होता. अचानक आकाशात ढग भरून आले आणि जोरदार गडगडाट झाला. होती नव्हती पांघरुणे'घेऊन मी झोपण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. साडेपाचच्या सुमारास अमोलचा सायंकालीन चहापानाचा कॉल आला आणि आम्ही सज्ज होऊन खाली गेलो. पाहिलं तर गरमागरम चहासोबत प्रिय बटाटवडे होते. तमाम मराठी वर्ग अगदी खुश होऊन गेला. सार्थकच्या जेवण आणि अल्पोपहाराच्या पदार्थांविषयी एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते. त्यांनी चारही दिवस अगदी आरोग्यपूर्ण आहार दिला. पदार्थ भलेही चमचमीत नसतील पण तब्येतीसाठी अगदी उत्तम होते आणि भरपेट खाऊन सुद्धा कोणालाही पोटाच्या कोणत्याच तक्रारी झाल्या नाहीत.


चहापान आणि बटाटेवडे भक्षणानंतर आम्ही हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या बागेत जाऊन आसनस्थ झालो. तिथे हिमाचलीन नर्तकांच्या तीन जोड्या त्यांच्या पारंपारिक वेशात हजर होत्या. आपल्या सवयीप्रमाणे प्रथम आदित्यने संध्याकाळचा आणि उद्या सकाळचा कार्यक्रम सांगितला. शिस्त म्हणजे शिस्त! इतकी मंडळी समोर शांतपणे बसल्यावर पुढील कार्यक्रम नाही सांगायचा म्हणजे काय? आदित्य दिसायला तसा साधाभोळा असला तरी अधूनमधून जनतेला टेन्शन देण्यात माहीर होता. आता हे नृत्य पाहण्याच्या आधीच तुम्हांला सुद्धा नंतर हाच नाच करावा लागेल हे सांगायची त्याला काय गरज होती? माझे नृत्यकौशल्य वाखाणण्याजोगे आहे. ज्या लोकांनी पूर्वी कधी त्याचा अनुभव घेतला नसतो ते बिचारे मला खूप आग्रह करतात आणि मग नाईलाजाने मी एक दोन स्टेप्स केल्या ते आपण ह्याला आग्रह करून किती भली मोठी चूक केली असा भाव तोंडावर आणतात.


ह्या नृत्याची ही काही चित्रे आणि चित्रफीत!





सुरुवातीला मंदगतीत सुरु झालेल्या ह्या नृत्याविष्काराने नंतर हळूहळू गती पकडली. सोबतीला सुमधुर संगीत होतेच.  जनता आता मनातल्या मनात ह्या स्टेप्सचा सराव करीत होती. आदित्याने नुसता इशारा करण्याचीच खोटी होती, सर्वजण तत्परतेने नृत्यात सहभागी झाले. प्राजक्ता चांगली नाच करीत असल्याने ती एकंदरीत खुशीत होती.


आदित्य, जितेश, अमेय आणि अमोल ह्यांनी ह्या नृत्यावर पूर्णपणे प्रभुत्व मिळविले आहे. समजा एखाद्या दिवशी ही नर्तक मंडळी येऊ शकली नाहीत तर हे लोक आरामात वेळ निभावू शकतील. फक्त त्यांना महिला कलाकारांची उणीव भासेल इतकेच! एकंदरीत हा नाच आम्ही अगदी आनंदाने अनुभवला. अगदी माझ्या नृत्यकौशल्यासहित!



त्यानंतर आदित्य आणि मंडळीनी दोन मजेशीर खेळ खेळून अजून धमाल आणली. ह्या दोन्ही प्रकारात महिला वर्गाने बक्षिसे पटकावली. हे खेळ कोणते हे इथे सांगून मी आदित्याची नाराजी ओढवू इच्छित नाही. ह्या खेळानंतर IPL च्या साथीने रात्रीचे मस्त जेवण पार पडले. बहुदा चायनीज मेनू होता. 

चार दिवस संपले होते. ही सहल कशी अगदी संपूच नये असे वाटत होते!


(क्रमशः)

No comments:

Post a Comment