Sunday, May 25, 2014

सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड - भाग ५

 चौथ्या दिवशीचा बर्फखेळ आणि हिमाचलीन नृत्य हा नक्कीच ह्या सहलीचा परमबिंदू होता. ह्या क्षणापर्यंत अनुभवलेल्या सर्व क्षणांना मागे टाकणारा! ह्या पुढील भेट दिल्या जाणाऱ्या प्रत्येक स्थळाला ह्या दोन अनुभवांनी दिलेल्या समाधानाच्या पातळीला मागे टाकावे लागणार होते.
पाचव्या दिवसाच्या सकाळचे आकर्षण होते ते सोलंग व्हॅलीची भेट आणि पॅराग्लायडिंग! पॅराग्लायडिंगविषयी आम्हांला एकंदरीत सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. हे करणार असाल तर स्वतःच्या जबादारीवर असे आम्हांला कोणताही आडपडदा न ठेवता सांगण्यात आलं होतं. क्रिया करताना जखमी झालेल्या आणि अतिदक्षता विभागात दाखल केल्या गेलेल्या लोकांची उदाहरणे सुद्धा देण्यात आली होती. त्यामुळे आमच्यातील कोणी मंडळी त्या प्रकाराकडे वळली नाहीत.


सकाळी नेहमीप्रमाणे उदरभरण करून आम्ही तवेरा किंवा तत्सम वर्गातील गाड्यांमध्ये स्थानापन्न झालो. पहिला थांबा होता तो हिडींबा मंदिर! हे मंदिर अगदी निसर्गरम्य परिसरात आहे. हिमाचल प्रदेशाला देवभूमी म्हटले जाते. आपल्याला इथे फिरताना अधूनमधून अशी ठिकाणे दिसतात की नक्कीच इतक्या स्वर्गीय सौंदर्याला देवाच्या अस्तित्वाचं वरदान लाभलं असलं पाहिजे असं मानायला मन (मनापासून!!) तयार होतं. हिडींबा मंदिराचा परिसर हा एक अशाच परिसरांपैकी एक! ह्या देवळाभोवती असलेली अगदी उंच (आता इथे गगनाशी स्पर्धा करणारी किंवा ज्यांच्या शिखरापर्यंत दृष्टी पोहोचवायची झाली तर डोक्यावरील टोपी खाली पडेल असे नाट्यमय शब्दप्रयोग आपण करू शकतो!) देवदार झाडांची गर्दी अगदी प्रेक्षणीय आहे. अगदी थोडीच सुदैवी सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकतात.
आमच्या सहलीचे "three musketeers"


मंदिराच्या आवारात आदित्याने आम्हांला एकत्र केले. ह्या मंदिराच्या एक पौराणिक आणि एक ऐतिहासिक अशा दोन्ही गोष्टी मी तुम्हांला  सांगतो असे प्रास्ताविक त्याने केलं. पौराणिक आणि ऐतिहासिक ह्या दोन शब्दाच्या भिन्न अर्थाविषयी आपण ह्या पूर्वी कधी विचार केला होता काय हे आठविण्याचा मी प्रयत्न करू लागलो.
पौराणिक कथा अशी की ह्या परिसरात हिडींब आणि हिडींबा असे दोन भाऊ बहिण राहत. हिडींब आपल्या प्रजेवर खूप अन्याय करी आणि त्यामुळे नाखूष असलेल्या हिडींबा हिने जो कोणी ह्या भावाचा वध करेल त्याच्याशी मी लग्न करीन अशी प्रतिज्ञा केली होती. "अरे वा! तुझी इच्छा असली म्हणून काय झालं, समोरच्याची इच्छा असायला हवी की नको" हा मनात डोकावणारा विचार आणि तोंडावर येऊ पाहणार हसू महत्प्रयासाने दूर सारलं. पुढे भीमाने हिडींबचा वध केला आणि हिडींबाने त्याच्याशी विवाह केला. (बघा इथे मी भीमाने हिडींबाशी विवाह केला हा शब्दप्रयोग टाळला की नाही!) ह्या दोघांचा पुत्र घटोत्कच ह्याने कौरवांबरोबर झालेल्या लढाईत मोठा पराक्रम करून मग प्राण सोडले. प्रत्येक गोष्ट घडायला विधात्याची काहीतरी योजना असते असं म्हणतात ते ही खरंच!
ऐतिहासिक कथा पंधराव्या शतकातील कोण्या एका राजाची! त्याने हे मंदिर उभारलं. मंदिर उभारणीनंतर ह्या मंदिराच्या सौंदर्यावर तो इतका खुश झाला की त्याने त्याच्या शिल्पकाराला बरेच द्रव्य देऊन त्याला गौरविले. परंतु  ह्या कारागिराने इतर कोठे जाऊन अजून असेच मंदिर उभारू नये म्हणून त्याचे हात तोडून टाकले. ताजमहालाबाबतीत सुद्धा आपल्याला अशीच कथा ऐकायला मिळते. परंतु हा कारागीर इतका हिमतीचा की त्याने अशा स्थितीत सुद्धा ह्यापेक्षा सुंदर मंदिर दुसऱ्या भागात जाऊन उभारलं. तिथेही त्याचा मोठा सत्कार करण्यात आला. परंतु त्या राजाने मात्र त्याला जीवानिशी मारून टाकले. खरी असल्यास किती दुर्दैवी कथा ही!
उद्या इतका सुंदर ब्लॉग लिहिणाऱ्याची  इंटरनेट जोडणी कोणी काढून टाकली तर किती दुर्दैवी!
आता ह्या मंदिराची बॉलीवूड कथा! रोजा चित्रपटात आपल्या नवऱ्याच्या शोधात काश्मिरात आलेली मधु एका मंदिरात येऊन देवाकडे आपल्या नवऱ्याच्या जीवनासाठी साकडं मागते. तिने एक नारळ फोडताच आजूबाजूचे सर्व सैनिक धावत येतात. तर ते हेच हिडींबा मंदीर! आता काश्मिरातले मंदिर हिमाचल प्रदेशात कसे आले असा विचार कोणी करू नये. ह्या मंदिराचे छत उतरते असून ह्या भागात होणाऱ्या बर्फवृष्टीवर हा उपाय! बाकी मंदिराच्या चौथ्या पायरीवर उभे राहून फोटो काढल्यास व्यवस्थित सर्व मंदिर कॅमेरात सामावता येईल हा सल्लासुद्धा आदित्य आणि मंडळींचाच!



मंदिराचा गाभारा अगदी शांत!  पंधराव्या शतकात देखील इथं कोणी वावरून गेलं असेल ह्या विचाराने आपल्याला अंतर्मुख करणारा! पुजाऱ्याने दिलेला प्रसाद ग्रहण करून आम्ही असेच बाहेर फिरत असताना "वीणा वर्ल्ड, वीणा वर्ल्ड" ह्या सादेने आपापल्या गाड्यांकडे खेचले गेलो.
गाडीत बसण्याआधी काही जणांनी याकवर बसून फोटो काढून घेतले!


आता पुढचा टप्पा होता केबलकार आणि पॅराग्लायडिंगचा! आमच्यासाठी फक्त केबलकारच उपलब्ध पर्यायात मोडत होते. हा परिसर अगदी विस्तृत होता.




 पॅराग्लायडिंग करून जमिनीवर परतणारे इथेच उतरत होते. केबलकार इथूनच वर जात होती. केबलच्या वर जाण्याच्या प्रवासात खालचा भूभाग तसा चांगला दिसत होता. खाली दिसलेला एक श्वानसदृश्य प्राणी हा कोल्हा असावा ह्या माझ्या तर्काला पुण्याचे सहप्रवासी सोहम आफळे ह्यांनी अनुमोदन दिले. वरती आकाशात मोठी छत्री घेतलेले साहसवीर मुक्त गगनविहार करीत होते.






वरती पोहोचल्यावर आम्ही समोर दिसणाऱ्या मोकळ्या भूभागाकडे प्रस्थान केले. इथेसुद्धा अजून रेंगाळणारा बर्फ होताच की! कालच्या अनुभवाने कौशल्यपातळी उंचावलेली बच्चेमंडळी तत्काळ तिथे धावली. हातात मावतील इतके बर्फाचे गोळा करून त्यांनी एकमेकांवर फेकण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी आपल्या मातांवर आक्रमणाचा रोख वळविला. इथे एक सोनेरी विग १० रुपये भाड्याने काही काळ वापरू देणारी बाई फिरत होती. अर्थात समस्त महिला वर्गाला हा मोह आवरला नाही. आपल्याच बायकांनी घातलेले  पाहून क्षणभर आम्हांला सुद्धा ह्या आपल्याच बायका ह्यावर विश्वास बसला नाही. तात्काळ मी प्राजक्तासोबत फोटो काढून घेतला!

आपापल्या वयोगटातील हिरो नंबर १!!!





थोड्या वेळाने केबल कारने आम्ही पुन्हा खाली उतरलो.  ह्या हवेतील मैगीला आम्ही सरावलो होतो. त्याचा आस्वाद घेताना पॅराग्लायडिंग करणाऱ्यांच्या अनेक लीला दिसत होत्या. एकाला त्याचा मार्गदर्शक समोर दिसणाऱ्या हिमशिखरापाशी घेऊन गेला असे रणमारे म्हणाले. आम्हांला दिसणारा एक साहसवीर ढगांमध्ये बराच वेळ विहार करीत होता आणि तो जमिनीवर कधी आणि कसा उतरेल ह्याची आम्ही चिंता करीत होतो. चिंतातुर जंतु!

पुन्हा एकदा हॉटेलचा परतीचा प्रवास! हो सांगायचं राहून गेलं. आमच्यातील काही जण रिवर राफ्टींगसाठी दुपारच्या भोजनानंतर जाणार होते. ह्या रिवर राफ्टींगचा आरंभबिंदू हॉटेलपासून ४५ किमीवर होता. दुपारच्या जेवणानंतर इतका प्रवास करणे आमच्या जीवावर आल्याने हा पर्याय आम्ही स्वीकारला नाही. परंतु मनालीला आल्यावर नक्कीच सर्वांनी रिवर राफ्टींग करावे. आणि खरेतर वीणावाल्यांनी रिवर राफ्टींगची वेळ सकाळची ठेवायला हवी होती असेच मलाच नव्हे तर सर्वांना वाटून गेले. 
दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकदा नभ मेघांनी आक्रमिले. ढगांचा मोठासा गडगडात झाला. वारेही सुटले आणि जडावलेल्या देहाला कधी निद्रेने आपल्या कब्जात घेतलं हे आम्हांला समजलंच नाही. अचानक साडेपाचला जाग आली. पुन्हा एकदा सायंकाळचा चहा आणि नास्ता! ह्यानंतर हॉटेलच्या परिसरात एक फेरफटका मारला. 
त्यानंतर होता तो सर्व तरुण मंडळी उत्कंठेने वाट पाहत असलेला डिस्को डेकचा प्रोग्रॅम. अंधाऱ्या वातावरणात सर्व नृत्यकुशल मंडळी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करीत होती. अशा गाण्यात सुद्धा स्टेप्स असतात हे हल्ली हल्ली कंपनीच्या कार्यक्रमात लोकांचे निरीक्षण करून शिकलो आहे. त्यातील 'तेरा प्यार प्यार हुक्काबार' हा ओळींच्या वेळी वरती हात करून धूर सोडण्याची कृती करावी हे बऱ्यापैकी माझ्या लक्षात राहिले आहे. त्यामुळे मी ती ओळ येण्याची बराच वेळ वाट पाहत होतो. बाकी माझ्या नृत्यकौशल्याविषयी मी मागच्या भागात लिहिलेच आहे. परंतु हल्ली आपल्याला जमेल तशा काही वेड्यावाकड्या स्टेप्स एका कोपऱ्यात करण्यास मला काही संकोच वाटत नाही. उगाच एका कोपऱ्यात बसून राहिले की लोकांचे लक्ष आपणाकडे जाते आणि मग ते उगाचच आपल्याला आत खेचतात त्यापेक्षा हा भाग परवडला. 
इथे नमूद करण्याची गोष्ट एकच! असं सर्वांसमोर वेडेवाकडी नृत्य करणे आपल्या संस्कृतीचा खरा भाग नव्हता. पण कोणास ठाऊक का पण आपण आज हे स्वीकारत आहोत. आणि ह्या अनाडी नृत्यावर नाच हा शहरी संस्कृतीच भाग बनत चाललं आहे. तेलकट, मसालेदार पदार्थ खावेत आणि मग ते पचविण्यासाठी अशा लीला कराव्यात. येणारा काळ आपणास अजून काय काय दाखविणार आहे कोणास ठाऊक! शेवटी जोडीनृत्याची वेळ आली. मंद पाश्चात्य संगीत सुरु झालं. प्राजक्ताने मला ह्या संगीतावर पदलालित्य करून दाखविण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण एकदा तिचा हात जवळजवळ पिरगळल्यानंतर आणि नंतर तिच्या पायावर बुटांनी जोरात पाय दिल्यावर तिने हा नाद सोडला! आणि आमचे नृत्य एकदाचे संपले आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. 
पुन्हा एकदा कमी जेवण्याचा केलेला मोडलेला संकल्प! एव्हाना निशादची आणि माझी चांगली दोस्ती बनली होती. अधूनमधून माझी तो खेचत असे. असाच रात्रीच्या जेवणाच्या वेळी तो माझ्याजवळ आला. त्याच्या चेहऱ्यावरील मिश्किल भावांनी मी सावध होऊन बसलो. माझ्या जुन्यापुराण्या ब्लॅकबेरीकड़े  पाहत म्हणाला, "काका जुना झाला की फोन!" मी सुद्धा म्हणालो "हो रे! पण करायचं काय?" चेहऱ्यावर आधी गंभीर भाव आणत तो म्हणाला, "पाण्यात टाका की!" आणि खो खो हसत पळत गेला!
पाचवा दिवस संपला होता!

(क्रमशः)

No comments:

Post a Comment